सगळे काही आहे, मग उणीव कशाची भासते?
रेशमाच्या शालीवर ‘जर’ कुठली बोचते?
घर आहे, घरपण नाही
घड्याळ आहे, वेळ नाही.
सगळे म्हणले तर आपले आहेत,
मग हरवला आहे कुठे जिव्हाळा?
वसंताचा ऋतू सरून कधी सुरु झाला उन्हाळा?
कोरडे,सपाट माळरान अन भणा ण णा रा वारा,
कानांमध्ये ओरडून आणतोय अंगावर शहारा
गदगदलेले मन जणू, काळोखलेलं आभाळ
पाऊस कोसळून न जाणे किती लोटलाय काळ
कधी जमला होता कट्ट्यावर मस्त गप्पांचा फड?
कधी हसून-हसून शेवटी ओलवली होती डोळ्यांची कड?

पुन्हा कोसळायला हवा आहे पाऊस,
पुन्हा रुजायला हवी हिरवी कूस,
काय हरवलंय, काय बिनसलय?
शोधत फिरतोय आठवणींचे माळरान
कुठेतरी ऐकू येते आहे टिटवीची एक तान
पावसाला आणायला परत काळा ढग फुटायला हवा
हिरवे व्हायला माळरान झरा एक वहायला हवा
कुठे मिळेल काळा ढग?
जुन्या घरात, कि घराच्या आठवणीत?
झऱ्याला पण सोडून आलोय परसातल्या वळचणीत
चालता-चालता थबकला पाय,
कान टवकारून अधिरले मन
ढवळल्या गेल्या जाणिवा साऱ्या
असे आले तरी कोण?
“साल्या, थांब!!”
अशी ओळखीची हाक आणि तीच परिचित शीळ
ऐकू आली गल्लीच्या टोकाला
अलगद ढग फुटला अन ओल आली डोळ्याला…..

One thought on “Guest Blog :vaishali Deshpande : “ओल””

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − nine =