इतक्यात गुलजारजींचा चा एक विडीयो बघण्यात आला. पुस्तकांवरची एक कविता होती.हा माणूस इतका लयीत बोलतो की त्याच साधं बोलणे ही कविताच वाटते.
तर, विषय होता की आजकाल लोक पुस्तक सोडून नेट वर जास्त वाचताहेत.मंडळी तुम्ही पण त्यातलीच का?
पण जसे जुने अल्बम बघताना, फोटो बघताना जो आनंद मिळतो ना, तो डिजिटल फोटो बघून मिळत नाही. अगदी तसच आहे हे, हाती पुस्तक धरून वाचताना जो आनंद मिळतो तो स्क्रीन वर वाचून मिळत नाही. मनच भरत नाही.
पुस्तके कशी शेल्फ वर मांडून ठेवावी.वाचनाचा मूड असला कि प्रत्येक पुस्तका वर हात फिरवत जावं.एखाद्या पुस्तकाशी अडावं, मग त्याला सांगावं. “ये मित्रा. आज तुझ्या बरोबर गप्पा मारते.”
खरंच, पुस्तके म्हणजे आपले मित्रच.सवंगडी. अगदी जन्मभराचे,
शाळेची सुरवात बघा पुस्तकाने होते.पूर्वी अंकलिपी असायची, आता त्यात खूपच विविधता आली आहे.रंगबिरंगी, मोठ मोठ्या अक्षरातील लहान मुलांची ती गोष्टीची पुस्तकं, आज देखील आपल्याला भुरळ पाडतात.
शाळेच्या सुरवातीला नव्या कोऱ्या पुस्तकांना कवर घालणे, हा एक सोहळाच असायचा.कवर नीट घातले गेले कि त्या नवीन पुस्तकांवरून हात फिरवायचा. मग हातात धरून अंगठ्याने एक एक पान हळू हळू सोडायचे, आणि त्या नव्या कोऱ्या पुस्तकाचा सुवास फुफुसात भरून घ्यायचा.
आठवलं ना बालपण?

पुढे कॉलेज मध्ये किती पुस्तके वाचली याची गणतीच नाही. पण शाळेतले पुस्तक प्रेम वेगळेच.प्रत्येक पुस्तकाचा शाळा सुरु होण्याआधीच फडशा पडलेला असायचा. कॉलेज मध्ये शैक्षणिक पुस्तकांपेक्षा कथा संग्रह, कादंबऱ्या, कविता अधिक जवळच्या वाटू लागल्या.अनेक लेखक, कवी जन्मभराचे सोबती झाले. आयुष्याचा कुठलाही क्षण घ्या, ह्या सर्वांनी त्यावर लिहिले आहेच.
पुलं, वपू, पाडगावकर,शांताबाई शेळके, रोज रोज हवेहवेसे वाटू लागले. पण शेल्फ कधी त्यांच्या पुस्तकांनी भरले नाही बर का, कारण त्यांची जागा थेट हृदयात होती.ते कधी पाठ करावे लागले नाहीत. पण नंतर मात्र वाटू लागलं कि असं बरच लिखाण आहे जे आपल्या कडे कागदावर काळं, अस हवंच.
कधी ही एखादे पुस्तक उघडा आणि तो संदर्भ वाचा. जीवन असोशी ने जगायचे असेल तर हे अगदी मस्ट आहे . मग काय पुस्तकांशी अधिकच गट्टी जमली.
ही पुस्तके मुकपणे आपली सोबत करीत असतात.
कधीही कुरकुर नाही;भांडण नाही.तुमच्या मूड प्रमाणे तुमची सोबत करणार. बरं, बरेच दिवस त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ती रागवत पण नाही बरा का. सदैव तुमच्या मदतीला तत्पर.
असे मित्र मिळायला भाग्य लागतं नाही का?
माझा मुलगा वाचायचा नाही. खूप वाईट वाटायचं.खूप मोठ्या आनंदाला तो मुकला आहे असा सारखं वाटायचं.पण अभ्यास करताना त्यांना वेळ काढणं जरा मुश्कीलच होतं. मोकळा मिळालेला वेळ पुस्तके वाचण्यात वाया घालवलेला त्यांना पटायचा नाही. त्यापेक्षा नेट वर गेम खेळायचे.
पण असं नेट वर असतानाच तो वाचू लागला.

अवांतर वाचन तसं होतं, पण ते ज्ञान मिळवण्यासाठी. मी मागे लागायचे कि आनंद मिळवण्यासाठी वाच.जीवनाची नव्याने ओळख पटावी म्हणून वाच.
त्याने बारावी पास केली आणि तो मला म्हणाला ;
“ आई, मला पुस्तकांची एक लिस्ट करून दे. मी ती सगळी पुस्तके नक्की वाचीन”
मला आकाश ठेंगणं झालं, कोण म्हणतंय की आजकाल पोरं वाचत नाहीत.त्यांना गोडी लावणं आपलच कर्तव्य आहे.त्यांच्या कलाने घेत, त्यांना हवं ते पुस्तक आधी वाचायला लावून, त्यांना या आनंद यात्रेचा वाटसरू बनविणे अगदीच अशक्य नाही.फक्त आपल्यात सजगता आणि संयम दोन्ही असावे.
माझ्या मुलाला वाचनाची गोडी लागली आहे, आता मी माझ्या पुतण्यांच्या मागे लागले आहे. त्यांचे आई बाबा त्यांच्यासाठी खूप पुस्तके आणतात. मग कधीतरी ते विचारतात, “काकू काय करू?”
असं विचारल की त्या दोघांना जवळ घेऊन एक पुस्तक काढायचं, मस्त सगळ्यांनी मिळून वाचायचं.
तुम्हीपण एखाद्या वीकेंड ला हा प्रयोग करून बघा.छानसा एखाद हलकंफुलकं विनोदी पुस्तक घ्या.बायको ला किंवा नवऱ्याला, पोरांना जवळ बसवा. आपण वीकेंड ला फिरायला जातो, ट्राफिक मध्ये अडकतो.बुकिंग मिळत नाही कधी कधी पिक्चर ची म्हणून नाराज होतो. पुस्तक जवळ घ्या. सगळे एकत्र बसा.मजेशीर कथा , त्यांना खुलवून, वाचून दाखवा.
बघा फिरायला जायला ,ट्राफिक मध्ये अडकून पडायची भीती नको, बुकिंग मिळेल का हि धास्ती पण नको.
पुस्तक वाचता वाचता अख्खा कुटुंब हास्य विनोदात रंगेल.एकमेकांशी मस्त गप्पा हि रंगतील मग.सगळे एकत्र येऊन आनंद घेणे या पेक्षा दुसरे सुख ते काय.
और क्या मंगता है लाईफ मे? मग करणार न हां प्रयोग?

2 thoughts on “Guest Blog: My Books, My friends by Vaishali Deshpande”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − 15 =